( राजापूर / प्रतिनिधी )
राजापूर तालुक्यातील गोवळ चौकटवाडी येथील वहाळात बिबट्या बसल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात अथवा हुसकावून लावण्यात वनविभागाला यश आले नव्हते. दरम्यान हा बिबट्या खूप दिवस उपाशी असल्याने थकलेला दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गोवळ चौकटवाडी येथील शिमगोत्सवाच्या मांडालगत वहाळ असून या वहाळालगत राहणाऱ्या ग्रामस्थांना बुधवारी सकाळी माकडे जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज आला. काही ग्रामस्थांनी वहाळाजवळ जाऊन पाहिले असता एक बिबट्या वहाळाच्या पाण्यात बसलेला निदर्शनास आला. त्यानंतर तात्काळ वनविभागाशी संपर्प साधून याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुरज तेली, विजय म्हादये, दिपक म्हादये, पथमेश म्हादये, दिपक चव्हाण आदी घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही मागविण्यात आला.
मात्र बिबट्या वहाळालगत असलेल्या काटेरी झाडीत जाऊन बसल्याने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करणे अवघड बनले होते. त्यानंतर सायंकाळी रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार सहकाऱ्यासह दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्याचा तसेच हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना यश आले नाही. वहाळात बिबट्या असल्याची बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते. रात्रीपर्यंत बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते.