(राजापूर / प्रतिनिधी)
नाम फाऊंडेशनकडून शहरातील कोदवली नदीपात्रातील सुरू असलेल्या आयटीआय कॉलेज ते जवाहर चौक नन्हेसाहेब पुलापर्यंतच्या गाळ उपशा कामाचे सुयोग्य नियोजन करून करण्यात आलेल्या गाळ उपशाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गाळ उपशाच्या कामात नाम कडून महत्वपुर्ण असे योगदान देण्यात आले आहे. या भागातील 75 टक्के काम पुर्ण झाले आहे.
गेली तीन महिने दोन गाळ उपसा यंत्रे व चार डंपरच्या सहाय्याने गाळ उपसा व वाहतुक करून नाम कडून या भागातील मोठया प्रमाणावर गाळ उपसण्यात आला असून या गाळ उपशामुळे भविष्यात निश्चितच राजापूरकरांना पुराच्या संकटापासून दिलासा मिळणार आहे.
राजापूर नगर परिषद, महसुल प्रशासन यांचा पुढाकार, राजापूरकरांनी सढळ हस्ते केलेली मदत आणि नाम फाऊंडेशनची गाळ उपशासाठी मिळालेली भक्कम साथ यामुळे राजापूर शहरातील कोदवली नदीचे पात्र गाळ मुक्त होण्यास मदत झाली आहे.
राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले या तीन प्रशासकिय अधिकाऱ्यांनी प्रशासकिय कामाच्या चाकोरी बाहेर जाऊन राजापूर शहरवासीयांवरिल पुराच्या पाण्याची टांगती तलवार कमी करण्याचा निर्धार व्यक्त करत प्रत्यक्षात कृतीतुन काम करण्यास सुरूवात केली. आणि त्याला नाम फाऊंडेशनची भक्कम साथ मिळाली.
शासनाकडून गाळ उपशासाठी मंजूर झालेल्या 25 लाख निधीतुन जलसंपदा विभागाकडून कोदवली व अर्जुना संगमापासून जवाहर चौकातील नन्हेसाहेब पुलापर्यंत गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले. तर पुढे नन्हेसाहेब पुल ते आयटीआय कॉलेज पर्यंतचे काम नाम फाऊंडेशन करण्याचे निश्चित करण्यात आले.
2 जानेवारी रोजी आयटीआय कॉलेज ते नन्हेसाहेब पुलापर्यंत गाळ उपसण्याचे काम नाम फाऊंडेशन हाती घेण्यात आले. नाम फाऊंडेशनचे कोकण विभागाचे समन्वयक समिर जानवलकर, राजेश्वर देशपांडे, अभियंता अभिलाश खरात यांनी प्रत्यक्षात पहाणी करून वारंवार भेट देऊन या गाळ उपशाच्या कामाचे सुयोग्य असे नियोजन केले. दोन गाळ उपसा यंत्रे व चार डंपरच्या सहाय्याने गाळ उपसून त्याची वाहतुक करण्याचे महत्वपुर्ण काम करण्यात आले. आज अखेर पर्यंत आयटीआय कॉलेज ते नन्हेसाहेब पुलापर्यंत सुमारे 75 टक्के गाळ उपशाचे काम पुर्ण झाले असून 15 एप्रिल पर्यंत ते 100 टक्के पुर्ण केले जाणार आहे.
त्यानंतर नाम कडून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील गाळ उपशाचे काम हाती घेतले जाणार आहे. नाम कडून अतिशय चांगल्या पध्दतीने करण्यात आलेल्या या कामाचे कौतुक होत आहे. तर शहरातील या गाळ उपशासाठी प्रशासन आणि जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल नाम कडून कृतज्ञता व्यक्त होत आहे.