(राजापूर)
राजापूर तालुक्यातील आडिवरेची महाकाली देवीच्या पालखीला खांदा मारण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही बाजूनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार नाटे पोलिसांनी एकूण 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 26 एप्रिल रोजी दुपारी 3.15 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश पडळकर (39, वाडापेठ, आडिवरे, राजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 26 रोजी महाकाली देवीची पालखी कोरगावकर यांचे घराजवळ आली असता ते खांदा देण्यासाठी गेले. मात्र त्याचवेळी गावातील तेली, भोई असे मानकरीही पालखीला खांदा देण्यासाठी तेथे गेेले. दरम्यान तेथे अगोदर हजर असलेले रवींद्र सकपाळ, दीपक सकपाळ, कृष्णा सकपाळ, पांडुरंग सकपाळ, अभिषेक आडिवरेकर, रविंद्र आडिवरेकर, सचिन आडिवरेकर, समीर आडिवरेकर, राजेंद्र सकपाळ (सर्व रा. वाडापेठ, आडिवरे, राजापूर) या संशयित 9 जणांनी मंगेश पडळकर व त्यांच्या सोबत असलेल्या रविकांत वारगावकर यांना तुम्ही पालखीला खांदा कसे देता ते बघतो असे असे बोलून दोघांनाही मारहाण केली. या मारहाणीत मंगेश पडळकर यांच्या गळयातील सोन्याची चेन तुटून नुकसान झालेे.
तर दुसर्या बाजूने रवींद्र सकपाळ यांनी नाटे येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महाकालीची पालखी आडिवरे ते वेत्ये अशी घेवून जात असताना कोरगावकर यांच्या घराजवळ पालखी आली असता मंगेश पडलकर, मंगेश वारगावकर, रामचंद्र वारगावकर, राहुल वारगावकर, मारुती वारगावकर, उदय वारगावकर, उत्तम धालवलकर, रविकांत वारगावकर (सर्व वाडापेठ, आडिवरे) या 8 जणांनी रवींद्र सकपाळ (55, आडिवरे) यांना धकलाबुकल करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे.
परस्परविरोधी तक्रारीनुसार 15 जणांवर नाटे पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतचा तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.