( राजापूर / प्रतिनिधी )
राजापूर तालुक्यातील वडदहसोळ खालीलवाडी येथील एका वृध्द दाम्पत्याला साडेतीन लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. फसवणूक करणारी व्यक्ती ही वाडीतीलच असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील अर्जुना पडयार (75) निवृत्तीनंतर पुन्हा मूळगावी पत्नीसह स्थायिक झाले. त्यांचा मुलगा गेली 7-8 वर्षे आईवडीलांपासून दूर राहत आहे. तो कुठे राहतो याची कल्पना अर्जुन पडयार यांना नाही. मात्र तो परत यावा यासाठी प्रयत्न करत होते. याचाच फायदा घेत एका व्यक्तीने सुमारे साडेतीन लाख रूपये उकळल्याचे समोर आले.
मुलाची पहिली पत्नी मुलांसह मुंबईला राहते. अर्जुना पडयार यांची नातवंडे जत्रेनिमित्त गावाला आली. गंडा घालणाऱ्या व्यक्तीने आपला मुलगा पत्नीला घटस्फोट देऊन आपल्याकडे येणार असून यासाठी सुमारे 1 लाख रूपयांची गरज असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी जमीन विक्रीचा निर्णय घेतला. नातवंडांना याबाबत शंका आल्याने त्यांनी चौकशी केली असता ही बाब उघड झाली. या व्यक्तीने गेले 8-9 महिने मुलासंदर्भात वेगवेगळया कथा सांगून रक्कम उकळल्याचे पुढे आले. यामध्ये अन्य व्यक्तीही सामिल असल्याचे समोर आले आहे. दरम्यान मुलाशी संपर्क झाला असता त्याला याबाबत काहीच कल्पना नसल्याचेही स्पष्ट झाले.. याबाबत अर्जुना पडयार यांनी राजापूर पोलीस स्थानकांत तक्रार दिली असून राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.