(राजापूर)
तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये तापसरी आणि डोळ्यांचा आजार वेगाने फैलावत असताना आता डेंग्यूच्या साथही सुरू झाली आहे. तालुक्यातील 18 हजार 767 घरांमध्ये केलेल्या तपासणीमध्ये 131 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असून त्या निकामी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्याचवेळी डेंग्यूच्या आजाराची लागण झालेला एक रूग्णही सापडला असून उपचाराअंती त्याची आता प्रकृती स्थिर असल्याचेही तालुका आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
डेंग्यूच्या साथीने रोखण्यासाठी शहरामध्ये नगर पालिकेतर्फे धूर फवारणी मोहिम राबविण्यात येत आहे. तर, शहरासह ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागातर्फे ‘कंटेनर सर्व्हेक्षण’ मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये डोळ्यांची आणि तापसरीची साथ पसरली आहे. या साथीला अटकाव करण्याच्या उपाययोजना केल्या जात असताना आता डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे. शहरामध्ये डेंग्यूचा एक रूग्ण सापडला असल्याने लोकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सापडलेल्या रूग्णावर ग्रामीण रूग्णालयामध्ये झालेल्या उपचाराअंती त्याची प्रकृती आता चांगली असल्याची माहीती पचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, डेंग्यूच्या साथीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या गावोगावच्या पथकांमार्फत सुमारे 18 हजार 767 घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 131 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असून त्या निकामी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, डेंग्यू साथीला अटकाव करण्याच्यादृष्टीने आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये आरोग्य पथकांमार्फत सर्व्हेक्षण आणि जनप्रबोधन करताना अळ्यांचा नाश करण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांनीही स्वतः घर आणि परिसरामध्ये स्वच्छता ठेवून डेंग्यूचा फैलाव होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, डेंग्यूच्या साथीच्या अनुषंगाने नगर पालिका प्रशासनही कमालीचे सतर्क झाले आहे. नगर पालिकेतर्फे शहरामध्ये धूर फवारणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.