(राजापूर / प्रतिनिधी)
तामिळनाडू येथे सुरू असलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राजापूरची सुकन्या कजोल गुरव हिने 52 किलो वजनी गटात 435 किलोग्रम वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले आहे. कजोलने सिनिअर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सलग चार वर्षे सुवर्णपदकांच्या विक्रमानंतर आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीने राजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राजापूरचे माजी नगरसेवक अशोक गुरव यांची सुकन्या कजोलने गेली 5 वर्षे पश्चिम रेल्वेकडून खेळत अनेक सुवर्णपदकांची कामाई व राष्ट्रीय विक्रमदेखील केले आहेत. तीची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली होती. तामिळनाडू येथे आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कजोल गुरवने 52 किलो वजनी गटात 435 किलोग्रम वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले आहे.
स्वतःचे स्थीर वजन व सातत्याने उंचावणारी कामगिरी यामागे कजोलची प्रचंड मेहनत आहे. कजोलला या वाटचालीमध्ये तिचा भाऊ आणि आशियाई सुवर्णपदक विजेता प्रतिक गुरव, भारतीय रेल्वेच्या अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कजोलच्या या यशाबददल कुटुंबिय तसेच राजापूर वासीयांनी कौतुक केले आहे.