(राजापूर)
राजापूर तालुक्यातील बारसू- सोलगाव परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारसू सडा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना पर्यावरण जतन आणि संवर्धनाच्या जाणीवेतून मुलांनी राबविलेल्या या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले जात आहे.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून बारसू सडा परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. याठिकाणी गेल्या महिन्यात प्रकल्पासाठी माती परीक्षण करताना बोअरवेल मारण्याचे काम शासनाकडून पार पाडले होते. यावेळी प्रकल्प विरोधक ग्रामस्थ आणि पोलिस-प्रशासन यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यावेळी या पोलीस कर्मचार्यांना बाटलीबंद पाणी आणि जेवण पुरविले होते. त्यांच्याकडून या ठिकाणी कचरा निर्माण झाला होता. सडा परिसरामध्ये अस्ताव्यस्त स्वरूपात ठिकठिकाणी टाकण्यात आलेला हा प्लास्टिक कचरा पर्यावरणाला घातक ठरणारा होता.
तसेच चारा खाण्यासाठी फिरणाऱ्या जनावरांसाठीही हा कचरा घातक होता.या कचर्याची विल्हेवाट लावणे प्रशासनाचे काम होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर बारसू-सोलगाव परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सडा पसिररातील प्लॉस्टिक कचर्याचे संकलन केले आणि हा संपूर्ण परिसर कचरामुक्त केला.त्यामुळे या शाळकरी मुलांच्या प्लास्टिक कचरा संकलन उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.