राजापूर : राजापूर शहरातील चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेला एक 40 वर्षीय इसम रानतळे येथील सड्यावर मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान या मृत इसमाच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यावर मारहाणीच्या खूणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. राजेश वसंत चव्हाण (40, रा.चव्हाणवाडी राजापूर) असे मयत इसमाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी येथील सलून व्यवसायीक राजेश चव्हाण हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत. अखेर मंगळवारी त्यांच्या पत्नीने सकाळी राजापूर पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता राजेश याचे शेवटचे मोबाईल लोकेशन रानतळे येथे मिळाले. पोलिसानी या परिसरात शोध घेतला असता मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर सड्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची खबर मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान राजेश याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तसेच चेहऱ्यावर जोरदार मार लागला होता. चेहरा रक्ताने माखलेल्या स्थितीत होता. तसेच राजेशच्या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचा मोबाईल फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मृतदेहाजवळ ग्लास व खाद्यपदार्थही आढळून आले. त्यामुळे राजेश याचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रानतळे येथील वस्तीलगत हा प्रकार घडल्याने राजापूरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान राजेश चव्हाण हा तरूण सलून व्यवसायीक म्हणून परिचित होता. पूर्वी जकातनाका येथे त्याचे सलून होते. आठ दिवसांपूर्वीच त्याने राजापूर ग्रामीण रूग्णालयासमोरील गाळ्यांमध्ये नवीन सलून दुकान सुरू केले होते. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांनी रानतळे येथे धाव घेतली.
*🚨रत्नागिरी 24 तास*
*अपडेट रहा, स्मार्ट बना…!*
*www.ratnagiri24taas.com*
*l ज्ञान l मनोरंजन l आरोग्य l टिप्स-ट्रीक्स l*
https://bit.ly/31FWW5X
Reg. No. MH-28-000953
⏩ *व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक*
https://bit.ly/3oVlyjH
➡️ *बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क :*
📞9527509806