(जैतापूर/साईशा लाड)
निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेल्या कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पर्यटकांसह सिनेसृष्टीलाही पडत आहे. बहुतांश मालिका, सिनेमा हे कोकणच्या भुमीतच केले जातात. कोकणातील लोकांची प्रेमळ वृत्ती आणि सहकार्याची भावना लक्षात घेऊन दिग्दर्शकही सिनेमासाठी कोकणची निवड करतात. नुकतेच गुहागरला एका मालिकेचे चित्रीकरण झाले आणि त्यानंतर आता राजापूर येथे श्यामची आई या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येत आहे.
राजापूर तालुक्यातील मुसाकाजी जेटीवर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांचा यामध्ये सहभाग आहे. चित्रपटाची निर्मिती पुणे येथील प्रोडक्शन कंपनी करत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सुजय डहाके या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याचे चित्रीकरण सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी येथील महाळुंगे, गावखडी आणि आता राजापूर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून स्थानिक लोकांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामुळे स्थानिकांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्यांच्या कलागुणांचा जोरावरत्यांची टीम उत्तुंग भरारी घेऊ शकते, असे दिग्दर्शक डहाके म्हणाले.
कोकणामध्ये खूप सुंदर स्पॉट आहेत, मात्र अनेक ठिकाणी असलेल्या गैरसोय, अस्वच्छता याबद्दल टीमने खंत व्यक्त केली आहे. किमान मूलभूत सेवा-सुविधा जरी उपलब्ध झाल्या तरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चित्रपट निर्माते दिग्दर्शक चित्रीकरणासाठी येतील, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारही येथे उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. मात्र यासाठी प्रशासनाने आणि स्थानिक लोकांनीही पुढाकार घेण्याची व जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे असे ते म्हणाले
या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कोकणातच झाले आहे. या टीमने भरभरून निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोकणचं भरभरून कौतुक केलं.