( साईशा /जैतापूर )
राजापूर विविध कार्यकारी सोसायटीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेती कर्ज घेताना सातबारावर बोजा चढविण्याच्या अटीमुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी वंचित राहात असल्याने बँकेने ही अट शिथिल करावी अशा मागणीचा ठराव जैतापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वार्षिक सभेत करण्यात आला.
जैतापुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सभा चेअरमन शर्फुद्दीन काजी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान संचालकांच्या उपस्थितीत जैतापूर येथे संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सभेत विविध विषयावर चर्चा करताना सध्या जिल्हा बँकेकडून खरीप कर्ज मंजूर करताना सातबारावर बोजा चढविण्याची अट ठेवण्यात आली आहे. दहा, वीस हजाराच्या किरकोळ शेती कर्जासाठी देखील अशा प्रकारच्या अटीमुळे अनेक शेतकरी आर्थिक सहाय्यपासून पासून वंचित राहत असल्याचा प्रश्न सदस्य राजन लाड यांनी उपस्थित करताना ही अट शिथिल करण्याची मागणी जिल्हा बँकेकडे करण्यात यावी असा सर्वानुमते ठराव करण्यात आला. तर चेअरमन काझी यांनी पूर्वी प्रमाणेच किरकोळ कर्जासाठी बोजा चढविण्याची परवानगी ग्राम तलाठी यांच्याकडे यावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तशा प्रकारचा ठराव शासनाकडे पाठविण्यात यावा असे उपस्थितांनी सांगितले.
मयत सभासदांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे दाखल करण्यात यावीत, नवीन सभासद नोंदणी ही करण्यात यावी, सभासद यादी अद्ययावत करण्यात यावी, सभासदांना लाभांश मिळावा अशा प्रकरच्या मागण्या करण्यात आल्या. यावर चर्चा करतानाच भेट वस्तू स्वरूपात लाभांश वाटप करता येईल का यावर संचालक मंडळ चर्चा करून निर्णय घेईल असे सांगण्यात आले .
संस्थेच्या कार्यालयासाठी आणि रेशन दुकानासाठी जैतापूर येथे स्वतःची इमारत व्हावी यासाठी जागा प्राप्त होण्यासाठी ग्रामपंचायतीला विनंती करण्यात यावी असा ठरावही करण्यात आला. जैतापूर येथे जागा न मिळाल्यास शेजारील दळे गावाचा ही विचार व्हावा अशीही सूचना करण्यात आली.
या सभेमध्ये देवचंद मांजरेकर, पद्मनाभ मांजरेकर, राजन लाड, संतोष पाटील, श्रीकृष्ण राऊत, सौ अनुराधा राऊत, सत्यवान जाधव, सुभाष दांडेकर आधी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला सभेचे सूत्रसंचालन आणि आभार सचिव श्री काळे यांनी मानले.