(राजापूर /वार्ताहर)
मुंबई गोवा महामार्गावर कोदवली पेट्रोलपंप नजीक मुंबईकडून गोव्याकडे भरधाव येणाऱ्या स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या डांबर वाहतुक करणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एक महिला जखमी झाली आहे. मात्र सुदैवाने यात जिवित हानी टळली असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.
याप्रकरणी टँकर चालक बाबासाहेब साहेबराव मोरे (रा. विक्रोळी मुंबई) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक बाबासाहेब मोरे हा आपल्या ताब्यातील टँकर क्र. एम एच-४६-बीयु-५१३९ ही गाडी घेऊन गोवाकडून मुंबईकडे जात असताना मुंबई गोवा महामार्गावर कोदवली पेट्रोलपंप नजीक पुलावरून एकेरी मार्गाने जात असताना अचानक समोरुन एक निळ्या रंगाची स्विफ्ट गाडी क्र. जी.ए. ०७ ई ४८२९ ही अतिवेगात त्याचे समोर असलेल्या इनोव्हा गाडी नं. एम.एच.०४ इ.एन. ४७४८ या गाडीला ओव्हरटेक करून वेगाने टँकरवर धडकली. आणि पुन्हा स्विफ्ट गाडी पुढे जावून उलट फिरून त्याचे मागुन येणा-या इनोव्हा गाडीला येवून पुन्हा धडकली. त्यातून हा तिहेरी अपघात घडला.
ही स्वीप्ट कार रोहिदास रामा चोडणकर हा चालवत होता. या अपघातात कार चालक यांची पत्नी सौ. वैशाली यांना दुखापत झाली आहे. त्यांचेवर राजापूर ग्रामिण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रूग्णालय ओरस येथे हलविण्यात आले आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.
या अपघातात टँकरचा हेडलाईट फूटलेला असून उजव्या बाजुचा बंपर वाकून नुकसान झालेले आहे. तसेच सदर स्विप्टकारचे पुढील बंपर व इंजिन व गाडीचे पूर्ण नुकसान झालेले आहे. तसेच इनोव्हा गाडी क्र. एम.एच.०४ इ. एन. ४७४८ चे फिरकोळ नुकसान झालेले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून राजापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.