( राजापूर / प्रतिनिधी )
तालुक्यातील शिवणे बु. गुरववाडी येथील तरुणाचा शेतामध्ये काम करताना मधमाश्या चावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यशवंत कृष्णा गुरव (40, शिवणे बु. गुरववाडी, राजापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची खबर दिलीप कृष्णा गुरव (46, शिवणे बु. राजापूर) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत गुरव हे शेतामध्ये कामाला गेले होते. तेथे त्यांना मधमाश्या चावल्या. यानंतर त्यांना राजापुरातील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार करुन घरी सोडण्यात आले. मात्र त्याच दिवशी 16 सप्टेंबर रोजी त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांना राजापुरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार तिवरेकर करत आहेत.