(राजापूर)
लोकसभा प्रवास यात्रेप्रमाणेच भाजपाच्या वतीने आता विधानसभा २०२४ प्रवास यात्रा संपर्क अभियान हाती घेण्यात आले असून सोमवारी राजापूर विधानसभा मतदार संघात याचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत हर घर भाजपा असा नारा देतानाच बुथ व शक्तीकेंद्र अधिक बळकट करताना विधानसभा मतदार संघातील ३४१ बुथवर भाजपाला ५१ टक्के इतके मताधिक्य देण्याचा निर्धार या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाच्या वतीने आता लोकसभा प्रवास यात्रेप्रमाणेच विधानसभा प्रवास यात्रा अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचा राजापूर विधानसभा मतदार संघात आढावा घेण्यात आला. यावेळी प्रमोद जठार, राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अॅड. दिपक पटवर्धन, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाउपाध्यक्ष व राजापूर विधानसभा संयोजक रवींद्र नागरेकर, विधानसभा सहप्रमुख सौ. उल्का विश्वासराव आदि मान्यवर उपस्थित होते.