(राजापूर)
आंबा बागेत फासकीत अडकून मृत झालेल्या बिबट्याला खड्ड्यात पूरून परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी बागेची राखण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बिबट्याचे काही अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार असून उर्वरित बिबट्याचे शव दहन करून नष्ट करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.
दि.2 एप्रिल रोजी खरवते येथील नितीन व सुनील पद्माकर कुलकर्णी यांच्या मालकीच्या आंबा बागेत बिबट्या हा वन्यप्राणी जमिनीमध्ये पुरला असल्याची गोपनीय माहिती राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांना समजली. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली असता साधारण पंधरा दिवसांपूर्वी फासकीमध्ये अडकून बिबट्या मृत झाला होता. त्या ठीकाणी बागेमध्ये राखण करणारे कामगार राजेश पुरण चौधरी व जगतराम अईतवारी थारू यांनी या मृत बिबट्याला खड्डा काढून पुरले व त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी जगतराम थारू, राजेश चौधरी व आंबा बागा देखरेखीसाठी घेतलेले आंबा बागायतदार तुषार तात्या सोरप यांना वनविभागाने ताब्यात घेऊन चौकशी केली व मृत पुरलेल्या बिबट्याचे शव बाहेर काढून वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांनी वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. वनविभागाने राजापूर पशू वैद्यकीय अधिकारी श्रीम.प्राजक्ता बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत बिबट्याचे शव खड्ड्यातून बाहेर काढून आरोपी तसेच आंबा व्यापारी व पंचांसमक्ष जप्त केले होते. सदर जप्त केलेले मांस, हाडे, कातडी, नखे सर्व नाशवंत असल्याने ते नष्ट करण्यासाठी सदर प्रकरण दि.3 एप्रिल रोजी न्यायालयात दाखल केले होते.
त्यानुसार दि.12 एप्रिल रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वनविभागाचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या आदेशानुसार व पशुसंवर्धन अधिकारी श्रीम.प्राजक्ता बर्गे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी प्रभात किनरे यांच्यासह वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सुरज तेली अनिकेत मोरे, गणेश गुरव, विजय म्हादे, नितेश गुरव, सुनील गुरव यांचे समक्ष व आरोपी जगतराम थारू, राजेश चौधरी तसेच आंबा व्यापारी तुषार सोरप यांच्या समक्ष वैद्यकीय तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबसाठी नमुने काढण्यात आले व उर्वरित बिबट्याचे शव दहन करून नष्ट करण्यात आल्याची माहिती श्री.सुतार यांनी दिली.
सदरचे प्रकरण न्याय प्रविष्ट करण्यात आले असून विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सुरज तेली हे करत आहेत. अशाप्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाच्या टोल फी क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करणेबाबत आवाहन वन विभागामार्पत करण्यात आले आहे.