( राजापूर / प्रतिनिधी )
राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे हातणकरवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास बिबटयाने एका घरात प्रवेश केला. मात्र घाबरलेल्या त्या कुटुंबाने एका खोलीत कडी लावून घेत घरात स्वतःला कोंडून घेतले. त्यामुळे अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे की, दीपक साखरकर यांच्या घरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बिबटया पडवीतील कोंबडयांच्या खुराडयात शिरला, मात्र घराचे दार उघडे दिसल्याने तेथून तो थेट घरात शिरला. यावेळी साखरकर यांच्या पत्नीने पाहिले आणि त्यांची बोबडीच वळाली. समोर प्रत्यक्षात बिबटया पाहताच आरडाओरडा करायला सुरुवात केली. घरातील इतर सदस्यांना त्यांनी एका खोलीत नेले. त्या खोलीची आतून कडी लावून कोंडून घेतले. घाबरलेल्या सर्वांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ साखरकर यांच्या घराच्या दिशेने धावले. ग्रामस्थांच्या आरडाओरडयाने बिथरलेला बिबटया घरातून पळाला तो थेट जंगलच्या दिशेने धावत सुटला. बिबटयाच्या तावडीतून सुटल्याने साखरकर कुटुंबाने सुटकेचा निःश्वास टाकला.
या घटनेची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली. तहसीलदार शितल जाधव व निवासी तहसीलदार दीपाली पंडित यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून घटनास्थळ ी दाखल होण्यास सांगितले. राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी आपल्या टीमसह पोहोचले. याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या.