( राजापूर )
यावर्षी शिमगोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात 4 दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यातील 2 घटना या हृदयविकाराच्या झटक्याने झाल्या आहेत. पहिल्या घटनेत संगमेश्वरात दिवसभर ढोल वाजवल्यानंतर एका माजी सैनिकाचा हृदय विकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राजापुरात शिवजयंतीनिमित्त ढोल वादन केल्यानंतर एकाचा मृत्यू झाला आहे.
तर तिसऱ्या घटनेत राजापुरात मुंबईहून देवी दर्शनाला आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान पावस येथेही होळी अंगावर पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. या 4 घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत प्रचंड जोषाने ढोलवादन करत असताना नाटेतील सचिन हरी ठाकूर या तरूणाचा मिरवणुकीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
प्रतीवर्षाप्रमाणे तिथीनुरूप येणारा शिवजयंती उत्सव सोमवारी नाटे येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. सायंकाळच्या सुमारास भव्य मिरवणुकीचे सवाद्य आयोजन करण्यात आले होते . या मिरवणुकीत नाटेतील सचिन ठाकूर हा देखील सहभागी झाला होता. सचिन हा ढोल-ताशा पथकप्रेमी होता. कोणत्याही मिरवणुकीत ढोल घेऊन तो अग्रस्थानी असे. सोमवारी देखील त्याने शिवजयंती सोहळ्याच्या उत्साहात आधी ताशा वाजवला त्यानंतर बराच वेळ ढोलवादन केले. या दोन्ही वाद्य झाल्यानंतर त्याने झांज वाजवण्यास घेतली. यादरम्यानच त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला उलट्या झाल्या. रक्तदाब मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याला धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. तेथून अधिक उपचारार्थ रत्नागिरी येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
सचिनच्या आकस्मिक निधनाने नाटे गावावर शोककळा पसरली. त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सारा गाव स्मशानभूमीत लोटला होता.