(राजापूर)
तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱ्या 2 नेत्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी. पोलिसांच्या या घटनेने बारसू, गोवळ परिसरातील वातावरण चांगलेच तापले आह़े. सत्यजित चव्हाण व मंगेश चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या रिफायनरी विरोधी नेत्यांची नावे आहेत़. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून 2 हजार पोलिसांची कुमक जिह्याबाहेरून मागवण्यात आली आह़े.
रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी जनतेशी संवाद साधल्यानंतर आता जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. सर्वेक्षणाला होणारा विरोध लक्षात घेता बारसू, गोवळ परिसरात 22 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात असल्याचे दिसत आह़े.
भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात कूड ऑईल रिफायनिंग करणारा रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग प्रस्तावित आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाव्दारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे. मागील वर्षापासून या प्रकल्पाला विरोध होत विरोधासाठी स्थानिक तसेच मुंबईत रिफायनरीविरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झाल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवत आहेत. या बाबत रिफायनरी विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे, हिंसक आंदोलन अशा स्वरूपाची आंदोलने केली आहेत.
बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी जमीन योग्य आहे किंवा कसे, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण व भू सर्वेक्षणाचे काम चालू करण्यात आले होते. त्यावेळी विरोधकांनी सर्वेक्षणाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता पुन्हा प्रस्तावित ठिकाणी माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी विरोधकांकडून सर्वेक्षणाच्या कामात अडथळा होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 22 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीपर्यंत तालुक्यातील बारसू सडा बारसू, पन्हळेतर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ परिसरात प्रशासकीय व पोलीस यंत्रणा यांची परवानगी असल्याशिवाय प्रवेश व संचार करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.