(राजापूर / प्रतिनिधी)
श्री देव अंजनेश्वराचा यात्रोत्सव आज सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बारा गावांचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मिठगवाने येथील श्री देव अंजनेश्वराचा कार्तिक उत्सव 3 नोव्हेंबर सुरू झाला असून 7 नोव्हेंबरला वार्षिक यात्रोत्सवाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाने पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाला दशक्रोशीतील अनेक भाविकांसह पुणे, कोल्हापूर, गोवा आदी भागातील भाविकही सहभागी होत असतात. यावर्षी उत्सवाच्या प्रारंभी मंदिराजवळील भव्य निशानकाठी बदलण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर यात्रोसवाच्या पूर्वसंध्येला मिठगवाणे तेली समाज बांधवांच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याचवेळी मंदिराभोवती कडू तेलाच्या प्रकाशात पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम होणार आहे. या उत्सवासाठी मंदिरावर नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सोमवार दिनांक 7 रोजी सकाळी दहा वाजता बलि पूजन, दुपारी 12 वाजता देवाला महाप्रसाद, त्यानंतर 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता त्रिपुर पूजन,रात्री 12 वाजता आरती नंतर पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर काढली जाईल. याचवेळी भोवती, दरबार झाडणे, लोटांगण हे कार्यक्रम पार पडणार आहेत. 2 वाजता लळिताचे किर्तन सुरू होईल आणि पहाटे चार वाजता उत्सवाची सांगता होणार आहे.
श्री देव अंजनेश्वर भक्त आणि भाविकांनी यात्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान विश्वस्त कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे