( साईशा / जैतापूर )
राजापूर तालुक्यातील दळे मठवाडी येथील तरुणाचा मुंबईत रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना राजापुरात कळताच परिसरात शोककळा आहे. गणेशोत्सवात गावाला येण्याचं त्याच स्वप्न अधुरच राहिल. वैभव प्रकाश पुरी (26, दळे मठवाडी, राजापूर) अस मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे.
मोलमजुरी व रिक्षा टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या श्री व सौ. विमल प्रकाश पुरी यांना एकुलता एक आधार असलेला वैभव यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैभव हा आपल्या आईसह डोंबिवली मुंबई येथे राहतो. रात्रपाळी आटपून कामावरून परतत असताना कुर्ला ते डोंबिवली या प्रवासादरम्यान रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला..
18 ऑगस्ट रोजी राजापूर तालुक्यातील दळे मठवाडी येथे त्याचे पार्थिव आणण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात मठवाडीच्या दफनभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .
गणपतीपूर्वी तो आपल्या आईसह गावी येणार होता. आपल्या वडिलांना गणपतीची तयारी करायला मी येतोय असा निरोपही पाठवला होता. गणपतीची खरेदीही करून ठेवली होती. परंतु गावाला येण्याचे आणि गणपती सणाचा आनंद घेण्याचं त्याच स्वप्न अधूरच राहील.