(राजापूर)
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणातील रखडलेल्या राजापूर शहरातील एसटी डेपो समोरील भुयारी मार्गाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली आहे. गुरूवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेऱ्या केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबतचे एक निवेदन गुरव यांनी ना. गडकरी यांना दिले आहे.
राजापूर शहराची लोकसंख्या सुमारे दहा हजार असून राजापूर तालुक्यामध्ये असलेल्या शासकिय कार्यालयांमधील कामानिमित्त तालुक्यातुन सर्व लोक राजापूर शहरांमध्ये येत असतात. राजापूर शहरांमध्ये आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाला ओलांडून सर्व लोकांना शासकिय कार्यालयामध्ये जावे लागते. त्यामुळे राजापूर एसटी डेपो समोरील राष्ट्रीय महामार्गाच्या येथे नागरीकांना इकडून तिकडे ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग(अंडरपास) ठेवण्यात यावा अशी मागणी यापूर्वीच संबंधित विभागाकडे केलेली आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी, तहसीलदार, प्रांताधिकारी, बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क करुन देखील राजापूर एसटी डेपो समोरील मंजूर झालेला अंडरपास आजपर्यंत करण्यात आलेला नाही.
सदरचा अंडरपास न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मोठया प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तरी याबाबत आपण स्वतः लक्ष घालून राजापूर डेपोसमोरील अंडरपास तात्काळ करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी गुरव यांनी केली आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम राजापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. स्थानिक लोकांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम अडू नये यासाठी आपल्या जागेची नुकसान भरपाई न घेता देखील राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आपली जागा उपलब्ध करून दिलेली आहे असे असून देखील अनेक जमीन मालकांना राष्ट्रीय महामार्गातील नुकसान भरपाई बाबतचे रक्कम अद्याप प्राप्त झालेला नाही याबाबत देखील कार्यवाही व्हावी अशी मागणी गुरव यांनी केली आहे.
फोटो : राजापुरातील एसटीडेपोसमोरील भुयारी मार्गाबाबत ना. नितीन गडकरी यांना निवेदन देताना अभिजित गुरव.