(जयपूर)
राशिद खान आणि नूर अहमद यांच्या गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फंलदाजांची दमछाक उडाली. राजस्थानला २० षटके फलंदाजीही करता आली नाही. गुजरातच्या भेदक मा-यासमोर राजस्थानचा डाव १७.५ षटकांत ११८ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातने मोठा विजय मिळविला आहे. आयपीएलच्या (IPL 2023) ४८व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ९ गडी राखून पराभव केला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर ५ मे रोजी (शुक्रवार) राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ११८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने १४व्या षटकातच लक्ष्य गाठले.
राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजांसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राशिद खान आणि नूर अहमद यांनी पाच विकेट घेतल्या, त्यामुळे राजस्थानचा डाव ११८ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर गुजरातने १ गडी गमावून शानदार विजय मिळविला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या राजस्थानची सुरुवात खराब झाली. आक्रमक जोस बटलर अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला तर मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल धावबाद झाला. यशस्वीने ११ चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन याने २० चेंडूत ३० धावांचे योगदान दिले. संजू सॅमसन याने राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही.
दरम्यान, प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या गुजरातचे सलामीवीर वृ्द्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने संयमी सुरुवात केली. दोघांनी ६६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर गिल ३६ धावांवर बाद झाला. त्यावेळी मैदानात उतरलेल्या कर्णधार हार्दिक पांड्या आणि साहा यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ९ गडी राखून गुजरातचा मोठा विजय झाला.
गुजरात टायटन्सचा १० सामन्यांमधला हा सातवा विजय असून गुणतालिकेत ते पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. राजस्थान रॉयल्सने १० पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर कायम आहेत. लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या तर एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या क्रमांकावर आहे.