(रत्नागिरी)
राजकीय उलथापालथीवरून रत्नागिरीत जुन्या नव्या शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नुकत्याच शहरात झालेल्या बैठकीत राज्यातील राजकीय नाट्याची चर्चा सुरू असताना ही बाचाबाची झाली. शिवसैनिकांच्या त्या बोलण्याचा राग मनात धरून एका लोकप्रतिनिधीने जुन्या शिवसैनिकाच्या कानशिलात दिल्याने जोरदार वाद झाला.
मागील काही दिवसांपासून जुन्या नव्या शिवसैनिकांमध्ये धुसफूस होती. मात्र नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे या संघर्षात आणखी भर पडली. रत्नागिरी शहरात शिवसैनिकांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जुन्या शिवसैनिकाने कठोर शब्दांचा वापर केला. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या एका लोकप्रतिनिधीने याचा राग मनात धरून मारुती मंदिर येथे ज्येष्ठ त्या शिवसैनिकाच्या कानशिलात लगावली आणि शिवीगाळही केली. मात्र ही गोष्ट त्या शिवसैनिकाच्या गावात समजतात संतापाची लाट उसळली. त्या गावातील सर्व लोक शहरातील धनजीनाका या ठिकाणी सदर लोकप्रतिनिधीच्या घराजवळ जमण्यास सुरुवात झाली. आपल्या घराजवळ जमलेले लोक बघून या लोकप्रतिनिधीचा पवित्रा एकदम बदलला. जमाव बघितल्यानंतर नरमाईची भूमिका घेत या लोकप्रतिनिधीने सर्वांसमोर माफी मागून वादावर पडदा पडला.