(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील ८० फुटी हायवेवरील रहाटाघर बसस्थानकाबाहेर गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गटार व शौचायलांचे पाणी रस्त्यावर येत असून, नागरिकांना या पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सव काळातही ना अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल ना आजी-माजी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, शहराच्या खालील भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
रहाटाघर बसस्थानकाला लागून असलेली ही गटार व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे या भागात वारंवार पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीपासूनच याठिकाणी रस्त्यावरुन गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. बसस्थानकामध्ये एसटी बसेस याच ठिकाणच्या गेटमधून प्रवेश करीत असल्याने, याठिकाणी रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. एसटी बसेस व चारचाकी, दुचाकी वाहने वेगाने गेल्यास याठिकाणाहून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर घाणीचे पाणी उडत आहे.
या गटारातच रहाटाघर बसस्थानकातील प्रसाधनगृह व स्वच्छतागृहांचे पाणी सोडलेले आहे. त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मांडवी बंदराकडे जाणारे अनेक अधिकारी आणि आजीमाजी लोकप्रतिनिधी या रस्त्यांवरुन जातात, परंतु त्यात सुधारणा करण्याबाबत कोणीच कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांमध्ये मात्र नाराजी पसरलेली आहे. प्रशासकीय अधिकारीही शहराच्या खालील भागाकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांची बनली आहे.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष पुरवून रस्त्यावर येणारी गटाराचे पाणी थांबवावे व त्याची योग्य विल्हेवाट लागेल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.