( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीमध्ये सामान्य जनतेचे खड्डे काही पाठ सोडताना दिसत नाहीत. जिकडे जावे तिकडे खड्डेच खड्डे. मुंबई – गोवा महामार्गावर तर अक्षरशः खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. रत्नागिरी शहरात तर संपूर्ण चाळण झाली आहे. या मुळे जनता त्रस्त असतानाच ग्रामीण भागातील सर्व सामन्यांना सोयीचे असणारे रत्नागिरी रहाटाघर एस. टी.बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडला आहे. यामुळे प्रवाशांसह बस चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानकातून बस बाहेर पडताना अक्षरशः हेलकावे खाते. अशावेळी बस पडतेय की काय अशी भीती प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. बस चालकही खड्ड्यांची आणि प्रवाशांची काळजी न करता जोरदारपणे वाहन हाकताना दिसत आहेत. त्यामुळे बसमधील प्रवाशी एकमेकांवर आदळने, खांबावर आदळण्याच्या घटना घडत आहेत. या बस मधून गर्भवती महिला प्रवास करत असतात. या खड्ड्यातून गाडी जाताना खांबावर आदळल्यास खूप मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी बस चालक अथवा एस. टी. प्रशासन जबाबदारी घेणार का? की ठेकेदार जबाबदार राहणार? असा प्रश्न प्रवाशामधून विचारला जात आहे. वारंवार या खड्ड्यांबद्दल आवाज उठवूनही कोणीच लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.