रत्नागिरी : रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत होत असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भाजपा ने याआधीही केला आहे. सत्ताधारी शिवसेनेकडून रस्त्यांच्या होत असलेल्या कामांबाबत प्रत्येक प्रभागात पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये देखील स्थानिक नगर सेवक यांनी प्रभागातील होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत प्रभागातील एका इमारतीतील लोकांनी अभिनंदन केल्याचे होल्डिंग प्रभागात लावले आहे. यावरती बोट ठेवत भाजपा चिटणीस निलेश आखाडे, ओबीसी जिल्हा महिला अध्यक्ष प्राजक्त रुमडे, सरचिटणीस राजन पटवर्धन, मनीष डोईफोडे, प्रभागातील भाजपा कार्यकर्ते, नागरिक यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
रस्त्यांची कामे करून स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेणारे निकृष्ठ कामांचे ही श्रेय घेणार का? निकृष्ट रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी विद्यमान नगरसेवक करणार का? नाचणे पॉवर हाऊस ते पॉलिटेक्निक कॉलेज गजानन महाराज मंदिर समोरील रस्ता करून आठवडा ही होतनाही. तोच यावर अवजड वाहने जाताच खड्डे पडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे. आत्ताच यावरील खडी-डांबर निघत आहे हे रस्ते किती दिवस टिकणार याबाबत कोणी पुढे येऊन जबाबदारी घेणार का? असा सवाल निलेश आखाडे यांनी उपस्थित केला आहे.
तर पाणी पुरवठा योजना सुरू होऊन ही अनेक भागात कमी दाबाने पाणी मिळत आहे त्याचे कारण काय. शहरातील नवीन पाणी योजना सुरू होताच अधिक दाबाने पाणी मिळणार होते त्याचे काय झाले असा प्रश्न प्राजक्त रुमडे यांनी उपस्थित केला आहे.