(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित मुले- मुली महिला, पुरुष दाखल होत असतात. रस्त्यावर फिरणाऱ्या, नातेवाईक नसणाऱ्या, मानसिक विकार असलेल्या महिला संस्थेत दाखल होऊन औषध उपचाराने बरे होतात. अशाच एक कोल्हापूरमधील एका महिलेला माहेर संस्थेच्या पुढाकाराने तिचे हक्काचे घर आणि कुटुंबीय मिळाले.
नोव्हेंबर 2022 मध्ये माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे पुण्यावरून येत असताना पुणे बेंगलोर हायवेवर सातारा नजीक एक निराधार, मळकट कपड्यातील महिला दिसली त्यांनी तिची विचारपूस करून औषध उपचार व सहाऱ्याची गरज ओळखून माहेर संस्थेच्या गाडीतून रत्नागिरी येथे माहेर संस्थेत दाखल केली. तिचे पुढील उपचार ओपीडी बेसवर प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे करण्यात आले.
पाच महिन्यानंतर सदर महिला बरी झाली व तिने आपले नाव येसाबाई दगडू एकशिंगे राहणार भुयेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असे सांगितले. सदर पत्त्यावर चौकशी केली असता येसाबाई एकशिंगे यांचे पती यांनी येसाबाई ही आपली पत्नी असल्याचे सांगितले. गेली पाच सहा महिने ती घरातून बाहेर पडली आहे. तसेच ती मानसिक विकाराने ग्रस्त असल्याने गाव सोडून बाहेर जाते परंतु पुन्हा ती घरी येते. यावेळी खूप दिवस झाले ती घरीच परतली नाही म्हणून आम्ही खूप चिंतेत होतो. आम्ही तिचा खूप शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. येसाबाईलाही घरी जाण्याची ओढ लागली होती. त्यांच्या पतीने माहेर संस्था हातखंबा येथे येऊन येसाबाई शिंदे यांना सुखरूप आपल्या ताब्यात घेतले.
माहेर संस्थेमुळे एका निराधार भटकणाऱ्या महिलेला आपले घर मिळाल्याने खूप समाधान वाटले असे माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले.