(भांडूप /किशोर गावडे)
भांडूप पश्चिमेच्या क्वारी रोड, प्रताप नगर जंक्शन, छत्रपती संभाजी महाराज चौक येथील 900 हि.मी व्यासाची जलवाहिनी आज (दि.10 सप्टेंबर) रोजी अचानक फुटली. हनुमान नगर, प्रताप नगर, कोकण नगर, काजू टेकडी, विक्रोळी ,कांजूरमार्ग, कोकण नगर, सह्याद्री नगर,
परिसराला पाणी पुरवठा करणा्री 900 मि.मी.व्यासाची जलवाहिनी आज रविवारी ( दि10) पुन्हा एकदा अचानक फुटण्याची घटना घडल्याने पालिकेचे करोडो लिटर पाणी वाया गेले.
दरम्यान फुटलेल्या उच्च दाबाच्या जलवाहिनीमुळे सुमारे २५ फुट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडाले होते. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मनपा एस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ व्हॉल्व बंद करून प्रथम वाया जाणारे पाणी थांबवले. मात्र पाणी पुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी वेळ लागेल असे पालिका सूत्राने सांगितले. परंतु जलवाहिनी वारंवार फुटते कशी ? हा चर्चेचा विषय ठरला आहे.
या परिसरातील पाच लाख नागरिकांना या जीआरपी माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. 900 मि.मी व्यासाची पाण्याची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली गेली. यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये व मे 2021 मध्ये, तोच रस्ता, तीच जागा आणि तीच जीआरपी जलवाहिनी, पुन्हा फुटली गेली आणि आज 10 सप्टेंबर 2022 रोजी ही जीआरपी जलवाहिनी पुन्हा फुटली गेली.
दोन्ही वेळा जल अभियंता खात्यातील अधिकारी आणि बेशिस्त ठेकेदारांच्या संगनमताने करोडो रुपयांची पालिकेने उधळपट्टी केली असल्याचे काहींचे म्हणणे आहे. उच्च दाबामुळे वेल्डिंग जॉइंडला तडा गेल्याने सदर जलवाहिनी फुटली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परंतु एस विभागाच्या कक्षेत येणाऱ्या अनेक नागरिकांना व परिसरातील रहिवाशांना, पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
गेले दोन वर्ष जीआरपी जलवाहिनी फुटण्याचे सातत्याने प्रकार वाढत असताना ठेकेदाराच्या बेशिस्त आणि हलगर्जीपणामुळे पालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. मागील वर्षी ठेकेदारांने दुरुस्तीच्या कामाला 19 दिवस लावले आणि सातव्या दिवशी पुन्हा ही जीआरपी जलवाहिनी फुटली गेली. यात नुकसान पालिकेचे झाले व करोडो रुपयांना अक्षरशा चुना लावला गेला. मात्र,असे असतानाही वारंवार जलवाहिनी फुटते कशी? तर यामागे गौडबंगाल काय? अशीही चर्चा सध्या प्रताप नगर व कोकण नगरात रंगू लागली आहे.
भांडुप पश्चिमेच्या क्वारी रोड, प्रताप नगर जंक्शन,छत्रपती संभाजी महाराज चौक, परीसर तसेच भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग लगतचा परिसरात बहुतेक विभागाच्या ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तरी सदर दुरूस्तीचे काम आज रात्रीपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम प्रगतीपथावर सुरू आहे. काम पुर्ण झाल्यावर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.