( मॉस्को )
भारताच्या चांद्रयान-३ नंतर आता रशियाने आपल्या चांद्रमोहिमेची तयारी सुरू केली आहे. तब्बल अर्धशतकानंतर रशिया पुन्हा एकदा चांद्रमोहीमसाठी सज्ज आहे. या चांद्रमोहिमेची माहिती देताना एका रशियन अधिकार्याने सांगितल्याप्रमाणे, ११ ऑगस्ट रोजी रशिया आपल्या चांद्रमोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक गाव रिकामे करणार आहे.
या मोहिमेला ‘लूना-२५’ असे नाव देण्यात आले आहे. रशियातील वोस्तोचन कोस्मोड्रोम या भागातून लूना-२५ अवकाशात झेपावणार आहे. हे ठिकाण मॉस्कोपासून सुमारे ५,५५० किलोमीटरवर पूर्वेला आहे. रशियाची अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ कडूनही या मोहिमेच्या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. या संस्थेने म्हटले आहे की, आग्नेय रशियातील खाबरोवस्क परिसरातील गाव सुरक्षेच्या कारणासाठी ११ ऑगस्टला सकाळी रिकामे केले जाईल. यानापासून वेगळे झाल्यानंतर रॉकेट बूस्टर कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात हे गाव आहे. लूना-२५ हे सोयूज-२ फ्रीगेट बूस्टरने लाँच होईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या मोहिमेचा उद्देश सॉफ्ट-लँडिंगचे तंत्रज्ञान विकसित करणे, चंद्राच्या अंतर्गत संरचनेबाबत संशोधन करणे आणि चांद्रभूमीवर पाण्यासह अन्य घटकांचा शोध घेणे हा आहे.