(मुंबई)
महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या विधान व कार्यपद्धतीवरून सर्वात वादग्रस्त राज्यपाल ठरलेल्या भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. परंतु आता येत्या काही दिवसांत राष्ट्रपती त्यांचा राजीनामा घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यांसदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजते आहे.
राज्यपाल रमेश बैस हे मूळ छत्तीसगड राज्यातील असून आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून त्यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या काही महिन्यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून तिन्ही राज्यात विजयी होण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
छत्तीसगडमध्ये सध्या कॉंग्रेसचं सरकार असून तिथं भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी प्रभावी चेहरा नाही. त्यामुळं छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी रमेश बैस यांच्याकडे देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रमेश बैस यांच्या छत्तीसगड मार्ग मोकळा केल्यास त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.