(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील शिवाजी नगर परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ बंदिस्त गटाराचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून येत होते. या समस्येमुळे तेथील नागरिक, रिक्षाचालक, पादचारी त्रस्त झाले होते. याबाबतची बातमी “रत्नागिरी 24 न्यूज”ने प्रसारित केली होती. या बातमीची दखल रत्नागिरी नगर पालिका प्रशासनाने घेतली असून दोन दिवसांत कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
या संदर्भात “रत्नागिरी 24 न्यूज”ने गुरुवारी (दिनांक ६ जुलै २०२३) बातमी प्रसारित केली होती. नगर पालिका प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन शनिवारी ( दिनांक ८ जुलै २०२३) सकाळी या भागातील गटार कर्मचाऱ्यांनी साफ केले आहे. या गटारात बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्यांचा अडकलेला खच बाहेर काढण्यात आला. घाणीने गटार तुडुंब भरल्याने पाणी थेट रस्त्यावरून वाहत होते. मात्र या समस्येवर दोन दिवसांत नगर पालिकेकडून कार्यवाही करण्यात आली आहे. गटारातील घाण काढून गटार प्रवाहित केल्याने नागरिक, रिक्षाचालक समाधान व्यक्त करीत आहेत. तसेच या समस्येवर प्रकाश टाकल्याबद्दल “रत्नागिरी 24 न्यूज”ला देखील विशेष धन्यवाद देऊन आभारही व्यक्त केले आहेत.