(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील श्री हनुमान मंदिराच्या वतीने प्रथमच मारुती मंदिर ते विठ्ठल मंदीरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मारुती मंदीर येथे ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा गजर करण्यात आला. शहरात भव्य टाळ मृदंगाच्या गजरात,मोठ्या भक्ती भावाने अभंग गात मिरवणूक काढण्यात आली. हजारो नागरिकांनी यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसह भाविकांची पावले विठूमाउलींच्या ओढीने पंढरपूरकडे केव्हाच निघाली आहेत, मात्र रत्नागिरीतील वारकऱ्यांची विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यांना प्रत्यक्ष तिथे पोहोचता येता येणार नसले, तरी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढून विठ्ठलनामाचा जयघोष करत त्यांनी त्यांचा भक्तिभाव विठुरायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
या वारीत रत्नागिरी जिल्ह्यात राहणारे वारकरी संप्रदायातील अनेक लोक सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये भगवे झेंडे फडकले. वारकऱ्यांनी भजने, आरत्या, हरिपाठ म्हटला. तसेच महिलांनी फुगड्या घालत उत्सव साजरा केला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या साऱ्या आबालवृद्ध वारकऱ्यांनी विठूनामाचा गजर केला.