(मुंबई)
बँकांकडून कर्ज घेत तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पुणेस्थित वेरॉन समूहाची पुणे, नागपूर, रत्नागिरी आणि गोवा येथील १२ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) जप्त केली. कंपनीचा आतापर्यंतच्या जप्तीचा आकडा १७९ कोटी २७ लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर रत्नागिरीत वेरॉन कंपनीने खरेदी केलेला भूखंड ईडीने जप्त केला आहे.
कॅनरा बँकेसह आणखी काही बँकांकडून कंपनीच्या विस्तारासाठी कंपनीचे मृत झालेले प्रवर्तक एस. पी. सवईकर यांनी कर्ज घेतले होते. कालांतराने हे कर्ज थकले; परंतु तरीही काही बँक अधिकाऱ्याशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या रकमेचे लेटर ऑफ क्रेडिट मिळविले होते.
या माध्यमातून कंपनीला जे पैसे मिळाले त्या पैशांचा वापर कंपनीने विस्तारासाठी न करता त्यातून काही प्रमाणात जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित पैसे अन्य ठिकाणी फिरवत वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनी व प्रवर्तकांविरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते. मात्र, गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.