( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रेल्वे चोरीतील संशयिताला रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पकडुन रत्नागिरी पोलिस ठाण्यात आणले होते. यावेळी लघुशंका झाली आहे असे सांगून बाहेर आणलेल्या संशयिताने भिंतीवरून उडी मारून फरार झाला होता. ही घटना नोव्हेंबर मध्ये घडली होती. पोलिसांनी त्याला कल्याण येथून पकडुन रत्नागिरीत आणले होते. त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. न्यायालयाने त्याला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ५००० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दत्तात्रय शिवाजी गोडसे, ( २१ वर्षे, रा. मु. नरळे वस्ती, पो. वाकी शिवणे. ता. सांगोला जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, १२/११/२०२२ रोजी रेल्वेमध्ये चोरी करताना आरोपी दत्तात्रय शिवाजी गोडसे यास रेल्वे पोलीसांनी पकडून त्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करीता रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे आणले असता व त्याने केलेल्या चोरीच्या कृत्याबाबत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना आरोपीने लघुशंकेकरीता जाण्याचे कारण सांगून तो फिर्यादी यांचे कायदेशीर रखवालीतून हाताला लावलेल्या बेडीसह पळून गेला होता. सदरबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे त्याच्यावर भा.दं.वि.सं. कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा कौशल्याने तपास करून पळून गेलेल्या आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती काढून, अवघ्या ७२ तासात सदर आरोपीस रत्नागिरी शहर व रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाणेच्या पोलीस पथकाने किंग्ज लॉजींग अॅण्ड डॉरमेंटरी, कल्याण (पश्चिम) या लॉजमधून ताब्यात घेतले होते.
सदर गुन्ह्याचे तपासीक अधिकारी स.पो.नि. मनोज भोसले व त्यांचे लेखनिक पोलीस नाईक वैभव शिवलकर यांनी सदर गुन्ह्याचा तपास अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करुन, मा. न्यायालयात आरोपी दत्तात्रय शिवाजी गोडसे याच्या विरोधात दोषारोपपत्र सादर केले होते.
मा. १ ले न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या न्यायालयात सदर गुन्ह्याबाबत सुनावणी होऊन, आरोपी दत्तात्रय शिवाजी गोडसे याच्या विरुध्द सदरचा गुन्हा शाबीत झाल्याने, मा. न्यायालयाने सदर आरोपीस तीन महिने सश्रम कारावास व रक्कम रुपये ५,०००/- दंडाची व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील म्हणून श्रीमती प्रज्ञा तिवरेकर यांनी तसेच पैरवी अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार दिपाली साळवी व महिला पोलीस शिपाई सुप्रिया लिंगायत यांनी काम पाहिले.
सदर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करुन आरोपीस अवघ्या ७२ तासात पुन्हा पकडून गुन्ह्याचा तपास अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करुन, मा. न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र सदर केल्याने तसेच आरोपीविरुध्द दोषसिध्दी झाल्याने मा. श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, रत्नागिरी आणि इतर मा. वरिष्ठांनी सर्व संबंधीतांचे विशेष अभिनंदन केले आहे.