(रत्नागिरी)
शहरानजीक रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांसाठी निवारा शेड असली तरी सध्या या शेडभोवती कचऱ्याचे साम्राज्य असल्याने त्यातून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तसेच शेडमध्ये दारुडे झोपून असल्याचे पाहायला मिळते. यामुळे प्रवाशांना रखरखीत उन्हात गाडीसाठी ताटकळत उभे राहावे लागते. या मार्गाने राजकीय मंडळींची सातत्याने ये-जा असूनही या शेडच्या दुरावस्थेकडे फारसे कुणाचे लक्ष जात नसल्याचे दिसत नाही.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर केवळ रत्नागिरीतीलच नव्हे तर बाहेरून येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे रत्नागिरीतून रेल्वेने जाणाऱ्यांची तसेच रत्नागिरीत रेल्वेने आल्यानंतर रत्नागिरी आणि परिसरात जाण्यासाठी अनेकांना एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. यासाठी रेल्वे स्थानकासमोर फाट्यावर मुख्य रस्त्यावरच रेल्वे स्टेशन बस थांबा आहे. या थांब्यावर रेल्वेतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची सतत गर्दी असते.
काही दिवसांपुर्वी या ठिकाणचा रस्ता खोदण्यात आला होता. सध्या या शेडच्या आजू-बाजूला दगडांचे ढीग तसेच कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. त्यामुळे या अस्वच्छ शेडचा उपयोग हे प्रवासी करू शकत नाहीत. त्यामुळे हे प्रवासी या बसथांब्याच्या आत थांबण्याऐवजी रस्त्यावरच उन्हात थांबणे पसंत करतात. सध्या रखरखते ऊन आहे. या उन्हातच ज्येष्ठांना किंवा लहान मुलांना घेऊन महिलांना उभे राहण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.
या मुख्य मार्गावरून जिल्ह्यात पालकमंत्री यांच्यासह विविध मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते ये-जा करतात. मात्र, या बसथांब्याची दुरवस्था कुणालाच दिसत नाही का? असा आता प्रश्न विचारला जात आहे. बसथांबा असूनही त्याचा प्रवाशांसाठी उपयोग नाही अशी स्थिती आहे. पावसाळ्यात तर या दुरवस्थेत अधिकच भर पडणार आहे. रेल्वे स्टेशन फाट्यावर विविध नेत्यांचे बॅनर्स लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुवारबाव येथील रेल्वे स्टेशन बस स्टॉपजवळ झालेली दुर्दशा दूर करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.