(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समिती मुंबई संस्थेच्या वतीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने नुकतेच बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने बौद्धाचार्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे बौद्धाचार्य शिबीर एकदिवसीय कालावधीत संपन्न झाले. या शिबीरामध्ये दोन महिला आणि अकरा पुरूष असे मिळून तेरा नवनिर्वाचित बौद्धाचार्यांनी सहभाग घेऊन बौद्धाचार्य परीक्षेमध्ये आपला सहभाग नोंदवला.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व नवनिर्वाचित बौद्धाचार्यांना बौध्दजन पंचायत समिती मुंबईचे खजिनदार नागसेन गमरे, मुंबई संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश भा. पवार, चिटणीस मनोहर बापू मोरे, रत्नागिरी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस सुहास कांबळे, संस्कार समिती रत्नागिरी चे चिटणीस रविकांत पवार आणि सर्व शाखा पदाधिकारी यांच्या समवेत बौध्दाचार्य प्रमाणपत्र आणि बौद्धाचार्य सनदपत्र प्रदान करण्यात आले.
या शिबिरात नवनिर्वाचित बौद्धाचार्यांना बौद्ध धम्म संस्कार विधी संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन बौद्धजन पंचायत समिती मुंबईच्या संस्कार समितीनचे अध्यक्ष मंगेश पवार आणि चिटणीस मनोहर मोरे यांनी केले. तर पाली भाषेचा अभ्यास आणि बौद्ध धम्म संस्कार विधीतील पाली भाषेचे उच्चार याविषयी बौद्धजन पंचायत समिती मुंबई चे नागसेन गमरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्याशिवाय या शिबिरात रत्नागिरी बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी च्या कार्यरत असलेल्या जुन्या बौद्धाचार्यांना बौद्धाचार्य सनद नुतनीकरण करून देण्याचे काम बौद्धजन पंचायत समिती मुंबई च्या उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.या शिबिरात रत्नागिरी बौद्धजन पंचायत समिती मुंबईच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित बौद्धाचार्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल रत्नागिरी बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे नवनिर्वाचित बौद्धाचार्य महेंद्र तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन विशेष आभार मानले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी चे सर्व प्रमुख पदाधिकारी व बौद्धाचार्य यांनी मेहनत घेतली. शेवटी आभारप्रदर्शनाने बौद्धाचार्य शिबिराची सांगता करण्यात आली.