[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या माहुली किल्ला परिसरातील हा सुळका. ज्याला “वजीर सुळका” या नावाने ओळखले जाते. दुर्गम परिसर, उंचच उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला हा 90° अंशातील 250 फुट उंचीचा सरळ “वजीर सुळका”. जिथे ही दृश्य पाहून सर्व सामान्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरच असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर रत्नागिरीतील माउंटेनिअर्स असोसिएशनच्या नऊ धडाकेबाज गिर्यारोहकांनी 9 जानेवारीला वजीर सुळका यशस्वीरित्या सर करून प्राणप्रिय भारतीय राष्ट्रधज फडकावला.
9 गिर्यारोहकांनी सुळक्यावरती केली यशस्वी चढाई
माउंटेनिअर्स असोसिएशन, रत्नागिरी टीमचे फिल्ड इन्चार्ज श्री.आकाश पालकर व ट्रेक लीडर श्री. ओम पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली 9 गिर्यारोहकांनी सुळक्यावरती चढाई केली व तिरंगा फडकविला. यामध्ये यश विश्वासराव, गार्गी गायकवाड, पार्थ शेलार, आश्रय शिंदे, प्रसाद कासार, साहिल मुळये, मानस कीर, अद्वैत जोशी, साईराज मयेकर या गिर्यारोकांचा सहभाग होता.
वजीर सुळका सर करण्याची ही माझी तिसरी मोहीम असल्याने केवळ दीड तासात हा सुळका सर केला. वजीर सुळका हा अतिधोकादायक आणि कठीण चढाईच्या श्रेणीत गणला जातो. केवळ गिर्यारोहकणाच्या साहित्याने हा सुळका सर करता येतो. सर्व अत्याधुनिक साहित्य असल्याने सुरक्षेची शंभर टक्के खात्री होती. मानसिक तयारी आणि साहसाच्या जोरावर हा सुळका समूहाने सर केला. या सुळक्यावरुन माहोली किल्ला दृष्टीपथास पडतो. तसेच नजर पुरत नाही एवढा प्रचंड एरिया दिसतो.
– श्री. आकाश पालकर (माउंटेनिअर्स असोसिएशन, रत्नागिरी टीम फिल्ड इन्चार्ज)