(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरातील बाजारपेठ परिसरात ‘एकल (सिंगल युज) प्लास्टिक विरोधात धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या प्लास्टिक विरोधात गुरूवारी येथील बाजारपेठेत दुकानांमध्ये केलेल्या तपासणीत 20 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 15 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
1 जुलै 2022 पासून रत्नागिरीत एकल वापर प्लास्टीकच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्याला पर्याय म्हणुन कापडी पिशव्या, बांबु, लाकडी वस्तू, सिरामिक्सचे प्लेट, वाट्या देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपुरक वस्तूंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत गुरूवारी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे व नगर परिषद कर्मचारी यांच्याद्वारे रत्नागिरी शहरातील परटवणे, गाडीतळ व गोखले नाका परिसरातील फळ विक्रेते, भाजी-पाला विकेते, स्वीट मार्ट, किराणा मालाची दुकाने या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यावेळी प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांकडून सुमारे 15,700/- एवढा दंड आकारण्यात आला.