( रत्नागिरी )
रत्नागिरी एसटी स्टँडचे घोंगड कित्येक वर्षे पावसात भिजतच आहे. याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींच लक्ष राहिलेलं नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी २६ जानेवारी यांनी बसस्थानक कामकाजाचा आढावा घेतला होता. लवकर बैठक घेऊन काम सुरू करण्यात येईल, असेही सांगितले होते. त्याच पुढे काय झालं काहीच कळल नाही. नेते नुसती आश्वासन देतात आणि निघून जातात. पेपर, सोशल मीडियावर फक्त 4 दिवस विषय गाजतो. कित्येक वर्षे हे काम रखडले आहे हे असंच चालू राहील तर बसस्थानक होणार तरी कधी? सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होतायत. याच कुणालाही सोयरसुतक नाही.
पेमेंट केलं नाही म्हणून ठेकेदारांनी काम बंद ठेवलं आहे, अस सांगितलं जातंय. ठेकेदारच पेमेंट नाही झालं तर बसस्थानक पण होणार नाही का? सरकारला, स्थानिक प्रशासनाला याचे काहीच सोयरसुतक नाही का ? बसस्टँड बाहेर उन्हातान्हात बसची वाट बघत ताटकळत उभ्या असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कोणी वालीचा नाही का ? असे अनेक प्रश्न संतप्त प्रवाशी रत्नागिरीतील सुजाण नागरिक करत आहेत.
सर्वसामान्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत खरेतर स्थानिक लोकप्रतिनीधींनी सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याची गरज आहे. परंतु काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच मशगुल आहेत. एस टी संपामुळे प्रवासी अगोदरच हवालदिल झाले आहेत. मात्र रत्नागिरी एसटी बस स्थानकाचे असेच काम राहिल्यास प्रवासीच आता जन आंदोलन उभारण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.