(रत्नागिरी)
शहरात आतापर्यंत ३ बेकायदा सावकारी प्रकरण उघडकीस आली आहेत. एकीकडे सावकारी घटनांमुळे होत असलेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. तर दुसरीकडे बेकायदा सावकारी व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यापूर्वी वैभव राजाराम सावंत (रा. झारणीरोड, रत्नागिरी), अक्षय शेखर पाटील (रा. नाचणे, रत्नागिरी) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी भार्गव मुरुगल (५५, रा. फणसोप, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत १० जणांविरोधात बेकायदा सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
भार्गव मुरुगल विरोधात रेहान सारंग (३७, रा. फणसोप, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये भार्गव मुरुगलकडून १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील १० हजार मुद्दल परतफेड करण्यात आली होती. परंतु, भार्गवने कर्जाची रक्कम तब्बल दीड लाख रुपये झाल्याची नोटरी करुन रेहानचा पासपोर्ट काढून घेतला होता. त्यामुळे त्याला परदेशात नोकरीसाठी जाताना अडचण येत होती. त्यातच मुरुगलने त्याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून रेहान ऑक्टोबर महिन्यापासून अचानक बेपत्ता झाला होता. तो बेपत्त झाल्याची खबर त्याच्य नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती.
शहर पोलिस त्याचा शोध घेत असताना दोन संशयास्पद मृतदेह पोलिसांना सापडले. रेहानचा घातपात तर झालेला नाहीना, या अनुषंगानेही पोलिस तपास करत असताना त्यांना रेहान आढळून आला. तेव्हा सावकारीचा हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सावकारी कर्जाबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केल्यानंतर सावकारी करणार्या १० जणांविरुध्द तक्रारी देण्यात आल्या आहेत. कामगार व सर्वसामान्य त्याला बळी ठरत असून जिल्ह्यात सावकारी कर्जामुळे होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी पोलिस दलाने पुढाकार घेतला आहे.