(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाणे मार्फत, मागील दोन महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल्स (भ्रमणध्वनी) शोधून काढण्यात आले. या शोध प्रक्रियेत रत्नागिरी पोलीसांनी एकूण 37 मोबाईल हँडसेट जप्त केले.
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 28/01/2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी शहर श्री. सदाशिव वाघमारे, कार्यालय अधीक्षक, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत, जप्त करण्यात आलेले एकूण 37 मोबाईल हँडसेट (भ्रमणध्वनी) पैकी उपस्थित 17 मुळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले.
रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नुकत्याच लोकार्पण झालेल्या सायबर पोलीस ठाणे येथे, माहीती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल व तपासाचे कामकाज नियमित रित्या सुरू करण्यात आले आहे. तसेच आपल्यासोबत झालेल्या, किंवा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सायबर फसवणुकींच्या गुन्ह्यांबाबत संपर्क क्रमांक: 8830404650 वर तात्काळ माहिती द्यावी अथवा याकरिता सायबर पोलीस ठाणे येथे स्वतः भेट द्यावी.