(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मराठी नाट्यसृष्टीला अनेक वर्षांचा वारसा आहे. कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक आदींच्या मदतीनं मराठी नाट्यसृष्टी अनेक वर्ष अविरत सुरू आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा विषय आजही ऐरणीवर आहे. त्यातील रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या विषयांमद्ये चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हे नाट्यगृह अभिनेते भरत जाधव यांच्या विधानामुळे चर्चेत आले असून मध्यवर्ती जागा, प्रशस्त इमारत आणि वारंवार या इमारतीच्या दुरुस्तीवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि त्यानंतरही नाट्यगृहात सुविधांचा अभाव असणे हे चित्र रत्नागिरीला अशोभनीय आहे. कलाकार, नाट्य संस्था यांनी वारंवार सूचना केल्यानंतर आणि दूरुस्तीवर करोडोचा खर्च झाल्यावरही नाट्यगृहाच्या असुविधांचा आजार काही बरा झालेला नाही. या नाट्यगृहासाठी करोडो रुपयांचा खर्च आजपर्यंत करण्यात आलेला आहे. इतका खर्च करून ही नाट्यगृहात वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये नाट्यगृहात एसी असून देखील वेगळे कुलर आणावे लागतात, सिस्टीममध्ये सतत बिघाड होत असल्याने आयोजक वेगळी साऊंड सिस्टीम आणली जाते. नाट्यगृहात अस्वच्छता दिसून येते. अशा अनेक समस्यांनी नाट्यगृह ग्रासले आहे.
शनीवारी रात्री रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी ‘मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम नव्हती. त्यामुळे कलाकार भरत जाधव नाराज झाला. “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा, अशी कळकळीची विनंती भरत जाधवांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही”, असं भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.
नाट्यगृहाची जबाबदारी रत्नागिरी नगर परिषदेकडे आहे. सावरकर नाट्यगृहातील गैरसोयीबाबत सुधारणा करण्याची वेळोवेळी केवळ आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी भूमिका भरत जाधवने मांडली. अर्थातच असुविधा बाबतची भरत जाधव याची नाराजी चुकीची नव्हती. परंतु रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही, असे सांगणे हे असल्याचे रसिकांचे मत आहे. भरत जाधव हे चुकीचेच, आज ज्या उंचीवर पोहोचला आहे त्यात रत्नागिरीच्या चाहत्यांचाही हातभार आहे, हे तो विसरला आहे का, असा सवालही आता केला जात आहे. त्यामुळे रत्नागिरीत प्रयोग करणार नाही असे सांगून त्याने रत्नागिरीच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे. हे लक्षात न घेता यापुढे रत्नागिरीत पाऊलही ठेवणार नाही असे विधान त्याने केले.
पालकमंत्री सामंत यांनी लक्ष देण्याची गरज
सावरकर नाट्यगृहाच्या प्रत्येक वेळच्या समस्येमध्ये सोडवणुकीसाठी सध्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील जनतेसाठी आणि नाट्य रसिकांसाठी ठोस असा प्रकल्प राबवावा अशी मागणी होऊ लागली आहे. सावरकर नाट्यगृहाची उंची अधिक असल्याने वातानुकूलन पुरेसे होत नाही. त्यामुळे एकतर या नाट्यगृहात मोठे बदल करावेत, असलेले नाट्यगृह सुसज्ज करावे नसेल तर रत्नागिरीत आणखी एखादे सुसज्ज नाट्यगृह उभारण्याबाबत विचार करावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.