रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीबाबत धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शहर काँग्रेसच्या येथे झालेल्या बैठकीत कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये दहा जणांचा समावेश सर्वानुमते करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे रत्नागिरी शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना दिली.
काँग्रेसच्या या नगर परिषद निवडणूक विषयक कोअर कमिटी अर्थात गाभा समितीमध्ये रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्ष राकेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस संजय तथा बाळा मयेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश शाहा, तालुका काँग्रेस खजिनदार नाथा आढाव, जिल्हा सरचिटणीस अश्फाक काद्री आणि बंडू शेठ सावंत, शहर खजिनदार बिपिन गुप्ता, शहर सल्लागार ॲड. पिलणकर, तालुका अध्यक्ष प्रसाद उपळेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांचा समावेश आहे.
राज्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी. काँग्रेस यांचे संयुक्त आघाडी सरकार कार्यरत असले तरी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत आघाडी होण्याची शक्यता नाही. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याचा नारा दिल्याने या पार्श्वभूमीवर शहरातील काँग्रेस पक्ष संघटना सक्रिय झाली असून स्वबळावर नगर परिषद निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसतर्फे नगर परिषदेच्या जागांवर निवडणूक लढविणे, उमेदवार निवड करणे, नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार चाचपणी करणे यासह निवडणूक डावपेच आखणे असे काम ही कोअर कमिटी करणार आहे.