( रत्नागिरी )
रत्नागिरी पालिकेवरील प्रशासकाचा कारभार राजकीय सत्ताधाऱ्यांनी त्यापासून शिकावे असा ठरत आहे. मुख्याधिकाऱी तुषार बाबर यांनी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्तेचे धडे देऊन चांगलाच प्रशासकीय वचक ठेवला आहे. कर्मचारी वेळेत हजेरी (बायोमेट्रीक), हलचल वहीने कामचुकारांना पायबंद, नगरसेवकांच्या दिमतीला सफाई कर्मचारी नसल्याने कोणत्या प्रभागात कामाचा खोळंबा नाही, शहरात पाण्याची कुठेही अनियमितता नाही, स्ट्रीट लाईटची वेळेवर दुरूस्ती, कचऱ्याची वेळेवर उचल यामुळे प्रशासकांची छाप पडली असल्याचे नागरिक आवर्जून सांगत आहेत.
रत्नागिरी पालिकेवरील नुकतीच पायउतार झालेली शिवसेनेची सत्ता असो, वा यापूर्वीची युती किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसची. पालिकेच्या प्रशासनावर वचक ठेवणे कोणालाही जमले नाही. वेळेत काम झाले, तर आश्चर्य अशी परिस्थिती होती. किती कडक, शिस्तीचा आणि अभ्यासू नगराध्यक्ष, नगरसेवक असला तरी त्याला टोलवले जायचे. पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची अजून नस सापडली नव्हती. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रशासनावर वचक ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यांच्या काळात काही विकास कामांना गती मिळाली. मात्र पाणी पुरवठा, रस्ते, सफाई हे मुलतभुत प्रश्न रखडले. कामेही रेंगाळली.
लोकनियुक्त प्रतिनिधिंची मुदत २७ डिसेंबरला संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले. त्यांनी खरोखर कौतुकास्पद पाऊले टाकली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना चार वेळा थम (बायोमेट्रीक हजेरी) अनिवार्य केले. थम लावून बाहेर पडणाऱ्याना हलचल वहिने चाप लावला आहे. टेबल सोडून बाहेर जाताना कुठे, कशासाठी गेलो आणि कधी आलो, हे लिहून ठेऊन आल्यानंतर स्वाक्षरी करणे ही बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी आपले काम भले आणि आपण, अशा भुमिकेत आले आहेत. जलवाहिनी फुटल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून दुसऱ्या दिवशी नागरिकांना पाणी दिले. कोणत्याही कामासाठी फोन केल्यास त्याला तत्काळ प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा कारभार चांगला, अशी प्रतिक्रिया येत आहे.