(रत्नागिरी)
रत्नागिरी पालिकेने आता घरपट्टी वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. घरपट्टी थकविलेल्या शहरातील ४८ मालमत्ता जप्त केल्या; तर चार ते सहा वर्षे पाणीपट्टी थकविलेल्या २२ जणांच्या नळजोडण्या पथकाने तोडल्या आहेत. वेळीच थकबाकी भरली नाही तर ही कठोर कारवाई अशी पुढे सुरू राहणार आहे. आतापर्यंत सहा कोटी ८० लाख एवढी म्हणजे ६२ टक्के घरपट्टी वसुली झाल्याचे वसुली पथकाने सांगितले.
पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान आहे. मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे घरपट्टी, पाणीपट्टी वसुली म्हणावी तशी समाधानकारक झाली नाही. कोरोना संकट संपुष्टात आल्यावर थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी आरोग्य विभागाच्या घंटागाड्यांवरून विनंती करण्यास सुरुवात झाली. घंटागाड्यांवरील या ध्वनिक्षेपकांवरून कारवाईचाही इशारा दिला जात होता. तरीही ग्राहकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मार्चअखेर असल्याने पालिकेने आर्थिक वर्षे संपण्यापूर्वी थकबाकी वसुलीसाठी आता कठोर पावले उचलली आहेत. पालिकेने वसुलीसाठी तीन पथके तयार केली असून, आजपासून थकबाकीदारांवर कारवाई सुरू करण्यात आली.
पालिकेच्या कर विभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली सागर सुर्वे आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई सुरू केली आहे. घरपट्टीचे सुमारे १० कोटी वसुलीचे लक्ष्य आहे. त्यातील सहा कोटी ८० लाख रुपये वसूल झालें असल्याचे सांगण्यात आले.