( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शासनाकडून निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आलेले पैसेही अन्यत्र खर्च होत असल्याने नगर परिषदेच्या १३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन कोटी देणे नगर परिषदेकडे थकीत आहे. हे पैसे मिळावेत यासाठी हे सेवानिवृत्त कर्मचारी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. आमचे पैसे कधी मिळणार असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे.
सुधारित पाणी पुरवठा योजने सह अनेक कामांवर अतिरिक्त खर्च करावा लागल्याने रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शहराअंतर्गत कामांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी निधीची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान नगर परिषदेसमोर आहे.
शासनाच्या विविध योजनांच्या तांत्रिक मंजुरीसाठी (टी.एस.) काही टक्के रक्कम आणि योजनेच्या एकूण खर्चातील ९ ते १० टक्के भरावी लागणारी रक्कम, सुधारित पाणी योजनेवरील करोडो रुपयांचा अतिरिक्त खर्च, यामुळे रत्नागिरी नगर परिषदेचा स्वनिधी गेल्या वर्षभरात संपुष्टात आला असून नगर परिषदेची तिजोरी रिकामी झाल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षभरात रस्त्याच्या दुरुस्तीवर झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चामुळे रत्नागिरी नगरपरिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे. त्याचा परिणाम नवीन विकास कामांवर होत आहेच शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी नगर परिषदेकडे पैसेच नसल्याचे सांगून त्यांना सातत्याने झुलवत ठेवले जात आहे.
रत्नागिरी नगर परिषद अधिकाऱ्यांकडून थकीत देण्यांबाबत सातत्याने टोलवाटोलवी केली जात असल्याने आता या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रागाचा पारा चढला आहे. या महिन्यात दोन कोटी थकीत रक्कम मिळाली नाही तर संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात नगर परिषदेतून सेवा निवृत्त झालेल्या आणि स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १३ कर्मचाऱ्यांना अद्यापही त्यांच्या ग्रॅच्युइटीचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच त्यांना पगार रोखिकरणही (अर्जित रजा विक्री) करता आलेले नाही. कर्मचाऱ्यांचे हे पैसे देण्यात नेमका विलंब कशामुळे होत आहे, असा सवाल केला जात आहे.
नगर परिषदेच्या नियमित सेवेतील ११ कर्मचारी ३० एप्रिल २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत निवृत्त झाले. त्यामध्ये वाहन चालक भगवान दत्तात्रय बेंद्रे, सफाई कामगार सत्यवान मनोहर खुले, लिपिक गणेश विश्वनाथ पाडळकर, फायरमन ज्ञानदेव श्रीरंग शिंदे, लॅब टेक्निशयन आदिती रवींद्र पराडकर, हवालदार मोहन गजानन पाटील, कुली गोपीनाथ लक्ष्मण नागले, मजूर चंद्रकांत मानका होरंबे, फायरमन सुधाकर ज्ञानु कांबळे, लाईनमन विजय मानका कुरतडकर, विलास अनंत कद्रेकर यांचा समावेश आहे. तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचे देणेही नगर परिषदेकडून थकीत आहे. या सर्वांना कर्मचारी पी. एफ. फंडाचे पैसे मिळाले असून निवृती वेतन सुरू झाले आहे. मात्र ग्रॅच्युइटी आणि त्यांच्या अर्जित रजेचा विषयही निकाली निघालेला नाही. १३ कर्मचाऱ्यांचे रत्नागिरी नगर परिषदेकडे १ कोटी ९० लाख रुपये थकीत आहेत. हे थकीत देणे कधी तातडीने मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पालकमंत्री न्याय देणार?
महिनाभरापूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर नगर परिषद प्रशासनाने ही बाब राज्य शासनाकडे लेखी कळवली होती. या विषयात रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही लक्ष घातले होते. मात्र त्यानंतरही या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा विषय निकाली लागलेला नाही. पालकमंत्री हा प्रश्न कधी सोडविणार आणि कर्मचाऱ्यांना कधी न्याय देणार, असा सवालही केला जात आहे.