(रत्नागिरी)
आधीच महागाईने होरफळलेल्या फ्लॅटधारकांना रत्नागिरी नगर परिषदेने मोठा धक्का दिला आहे. सदनिकेत ज्या फ्लॅटधारकांनी गुंतवणूक केली आहे आणि उत्पन्नाचे साधन म्हणून फ्लॅट भाड्याने दिले आहेत, त्यांच्यावर नगर परिषदेने वक्र नजर टाकली आहे. अशा फ्लॅट धारकांना नगर परिषद प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर वाढीव कर लावला आहे.
नगर परिषदेने अनेकांना 32000 पासून 50000 पर्यंत कर आकारणी केली आहे. त्यामुळे फ्लॅटधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कोणाला हरकत घ्यायची असल्यास नगर परिषदेने हरकतीसाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे असे अर्ज घेऊन अनेक नागरिक सध्या रत्नागिरी नगर परिषदेत हेलपाटे घालताना दिसत आहेत. काही नागरिकांनी भाडेकरू ठेवले नसताना देखील नगर परिषदेने त्यांना नोटीसा दिल्या असून काही नागरिक बाहेर गेले असता त्यांच्या फ्लॅटवर अशा नोटीसा चिकटवण्यात आल्या असल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे काही फ्लॅट धारक नगर परिषदेच्या कारभारावर संतापले आहेत.