(संगमेश्वर / प्रतिनिधी)
निसर्गरम्य संगमेश्वर-निसर्गरम्य चिपळूण फेसबुक ग्रुपच्या मध्यमातून गेली 4 वर्षे नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस गाड्या संगमेश्वर रोड स्थानकावर थांबण्यासाठी कोकण रेल्वेकडे पत्रव्यवहार सुरू आहे. त्याचबरोबर संगमेश्वर रोड स्थानकात व स्टेशन रोडसंदर्भातील सोयीसुविधांसाठी पत्रव्यवहार करून काम करून सुद्धा घेतली असल्याचे संदेश जिमन यांनी सांगितले.
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर या गाडीसाठी संगमेश्वर रोड स्थानकासाठी राखीव डबा आधीपासूनच होता. सणासुदीच्या काळात संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांना त्याचा आधार होता. मात्र कोवीड काळात ही सुविधा बंद करण्यात आली. सर्वकाही सुरळीत सुरू झाले. परंतु संगमेश्वरसाठी राखीव डबा सुरू करण्यात येत नव्हता. त्यासाठी 6 जून 2023 रोजी कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांना यासंबंधी पत्र पाठविण्यात आले. तसेच रत्नागिरीचे रिजनल रेल्वे मॅनेजर रवींद्र कांबळे यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या प्रयत्नांना यश येेऊन रत्नागिरी-दिवा पॅसेंजरला 10 जुलै पासून संगमेश्वरसाठी राखीव डबा मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल संजय गुप्ता व रवींद्र कांबळे यांचे संदेश जिमन यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर लाखाच्यावर प्रवासी व चार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या संगमेश्वर रोडवासीय जनतेच्या मूळ मागणीचा विचार कोकण रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर करावा अशी अपेक्षा संदेश जिमन यांनी व्यक्त केली आहे.