(रत्नागिरी)
रत्नागिरी (दक्षिण) भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची बैठक रत्नागिरी (द.) भाजपा कार्यालय, रत्नागिरी येथे संपन्न झाली. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आत्तापासून कामाला सुरुवात करण्यासाठी सर्व महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. “जवळपास सर्वच महिलांना घर, नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून पक्षाचे काम करावे लागत असल्याने तारेवरची कसरत होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आदरणीय मोदीजी तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्यांच्या समर्थनार्थ हात उंचावेपर्यंत आपल्याला व्यक्तिगत आणि पक्षाच्या संसाराचा कणा बनून काम करावे लागणार आहे.” अशाप्रकारे प्रेरणादायी उद्बोधन सौ. साळवी यांनी केले.
भाजपा नेते श्री. बाळासाहेब माने यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांचे भारतीय जनता पार्टीतील उन्नत स्थान याविषयी मार्गदर्शन केले. “राष्ट्रयोगिनी स्व. सुषमा स्वराज, केंद्रीय अर्थमंत्री श्रीम. निर्मला सितारमन यांच्यासारख्या कर्तृत्त्वान स्त्रियांनी निर्माण केलेला आदर्श तसेच झुंजार नेतृत्व आणि आक्रमक वक्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीम. स्मृती इराणी यांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यासाठी महिलांनी अधिकाधिक समाजाभिमुख होण्याची गरज आहे. पक्षाने दिलेले कार्यक्रम सातत्यपूर्ण रीतीने केल्यावर तुम्ही हा टप्पा सहज पूर्ण करू शकाल.”
जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी महिलांना करणीय कार्याची माहिती दिली. “पक्षाने महाविजय २०२४ साठी नियोजनबद्ध कामांची यादी दिली असून दैनंदिन जीवनातील ३ तास पक्षकार्यासाठी देण्यास सांगितले आहेत. रोज नवीन लोकांच्या गाठीभेटी घेणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्यांच्या निराकरणासाठी पक्षश्रेष्ठींच्या मदतीने प्रयत्न करणे हे कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील. यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येही आपल्याला अग्रस्थानी रहायचे असल्याने आपल्या कामाचा आलेख चढता असला पाहिजे.”
या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, लांजा तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये, सौ. वर्षा ढेकणे, सौ. अपेक्षा दाभोळकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्या, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा, तालुका सरचिटणीस व अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.