(गणपतीपुळे / वैभव पवार)
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री व रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या शिफारसीने रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी महोदयांनी नियुक्ती केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या तालुकास्तरीय रत्नागिरी तालुका दक्षता समिती (रेशन धान्य पुरवठा) सह अध्यक्षपदी मालगुंडचे सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी यांची नियुक्ती झाल्याबद्दल मालगुंड ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मालगुंड ग्रामपंचायतीच्या एका विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मालगुंडचे प्रसिद्ध बांधकाम ठेकेदार शेखर खेऊर यांच्या हस्ते राजू साळवी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाला मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, ग्रामविकास अधिकारी नाथाभाऊ पाटील, उपसरपंच संतोष चौगुले, ग्रामविकास अधिकारी नाथाभाऊ पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य, सर्व ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना राजू साळवी यांनी सांगितले की, गावातील सर्व गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला आपल्याला विविध पदांवर काम करता आले तसेच याच आशीर्वादामुळेच आणि तसेच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारसी मुळे आपल्याला रत्नागिरी तालुकास्तरीय रत्नागिरी तालुका दक्षता समितीचे सहअध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या समितीवर काम करताना सर्वसामान्य लोकांच्या ज्या-ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण सर्वस्वी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मालगुंड ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी विशेष ऋण व्यक्त करून असेच आशीर्वाद व प्रेम कायमपणे पाठीशी राहू दे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
राजू साळवी यांची महाराष्ट्र शासनाच्या दक्षता समितीवर सहअध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रत्नागिरी येथील तहसीलदार कार्यालयात त्यांचे रत्नागिरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे नूतन अध्यक्ष सुनिल नावले, समिती सदस्य कोतवडे विभाग प्रमुख तारक मयेकर, माजी सदस्य रामभाऊ गराटे, शंकर झोरे, नायब तहसीलदार चव्हाण व सदस्य आदींसह कोतवडे जिल्हा परिषद गटातून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.