(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुका काष्ट्राईब माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेची सभा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी रत्नागिरी येथे शनिवार दि. ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभेची सुरूवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसुर्य विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित रत्नागिरी जिल्हा काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच लांजा तालुका पदाधिकारी व सदस्य, संगमेश्वर तालुका पदाधिकारी व सदस्य आणि सर्व सभासदांचे रत्नागिरी तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिपोशी हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी दिपक गमरे तसेच जिल्हा काष्ट्राईब संघटनेचे सहसचिव सुवेश चव्हाण यांची सैतवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल रत्नागिरी तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सभेपुढील विषयांना सुरुवात करताना प्रथम रत्नागिरी तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. यांमध्ये रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी एस्. के. जाधव यांची जिल्हा काष्ट्राईब संघटनेच्या पहिल्याच सभेत बिनविरोध करण्यात आली होती. या सभेत रत्नागिरी तालुका उपाध्यक्षपदी उमेश तायडे (नेवरे हायस्कूल) तर सचिवपदी सुनिल जाधव (जागुष्टे हायस्कूल रत्नागिरी) तर सहसचिवपदी संतोष वाजे (वरवडे खंडाळा हायस्कूल) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल जिल्हा कार्यकारिणी यांच्याकडून तालुका पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच उपस्थित काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यांमध्ये खंडाळा येथील नंदादीप जाधव, लांजा तालुका अध्यक्ष संतोष कांबळे,नेवरे हायस्कूलचे उमेश तायडे यांनी आपल्या प्रमोशन (पदोन्नती) यासंदर्भात सभागृहाला माहिती दिली. त्यानुसार जिल्हा अध्यक्ष भालशंकर, सचिव पांढरे, कार्याध्यक्ष कांबळे, सहसचिव सुवेश चव्हाण यांनी पदोन्नती प्रश्न सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील याविषयी अधिक माहिती दिली. ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी तालुका अध्यक्षांच्या मार्फत जिल्हा कार्यकारिणीकडे लेखी अर्ज सादर करावेत असे ठरविण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी व सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तसेच संघटनेसाठी आर्थिक योगदानही दिले पाहिजे असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात भालशंकर सरांनी व्यक्त केले. शेवटी जिल्हा सहसचिव सुवेश चव्हाण सर यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर केले. या सभेसाठी जिल्हा अध्यक्ष जगदीश भालशंकर, सचिव प्रकाश पांढरे, कार्याध्यक्ष राजेश कांबळे उपाध्यक्ष रशिद तडवी, सहसचिव सुवेश चव्हाण, जिल्हा संघटक लता पांढरे, जिल्हा सदस्य संजय पाटील, लांजा तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, दिपक गमरे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष एस्. के. जाधव , संतोष वाजे, उमेश तायडे, कलिंदर तडवी, बलदार तडवी, कुरतडेचे सुनिल कांबळे, नंदादीप जाधव उपस्थित होते. ही सभा यशस्वीतेसाठी तालुका पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.